गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी : जिल्ह्यातील बेकायदेशीर लोहखाणी, बळजबरी भूसंपादन व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्याकरिता डाव्या पुरोगामी पक्षांच्या वतीने एकतेची हाक देण्यात आली असून गुरुवारी दुपारी १२ वाजता आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयात सर्वपक्षीय जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरची आणि एट्टापल्ली तालुक्यात विकासाच्या नावावर कायदे - नियम धाब्यावर बसवत बळाचा वापर करुन लोह खाणी खोदल्या जात आहेत. आष्टी - कोनसरी, मार्कंडा- भेंडाळा, कुरुड - कोंढाळा येथे कारखानदारांसाठी विशेष एमआयडीसीची स्थापना करुन शेतकऱ्यांच्या सूपीक जमीनी बळजबरीने हिसकावून घेण्याचे प्रयत्न शासन करत आहे. नियोजना अभावी जिल्ह्यात उद्योग सुरु झाल्याने गेल्या काही वर्षांत अपघातांची मोठ्याप्रमाणावर वाढ होवून शेकडो नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे. या परिस्थितीत जिल्हावासीयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून स्थानिकस्तरावर या बळजबरी विकासाचा भूमिपुत्र विरोध करीत असतांना सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या कानावर भूमिपुत्रांच्या विरोधाचा आवाज पोहचविण्यासाठी व्यापक संघर्षाची आवश्यकता असल्याने राजकीय पक्ष, सामाजिक संगठना, पर्यावरणवादी आणि पारंपारिक इलाखे - ग्रामसभांनी एकत्र यावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, भाग्यश्रीताई आत्राम, शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र चंदेल, वासुदेव सेडमाके, अरविंद कात्रटवार यांचेसह खदान आणि प्रकल्पांना वेळोवेळी विरोध करणारे राजकीय पक्ष - सामाजिक संघटना, ग्रामसभांचे नेते - कार्यकर्ते आणि व्यक्तींनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ.डाॅ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदिश मेश्राम, काॅ. सचिन मोतकुरवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, काॅ. डाॅ. धर्मराज सोरदे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, भाई रमेश चौखुंडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, रुषी सहारे समाजवादी पक्षाचे इलियास खान यांनी केले आहे.
Post a Comment