गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
जण हितार्थ
विशेष लेख
आजची तरुणाई लग्नाच्या बाबतीत उदासीन आहे तर काहींना लग्न करायची इच्छा असूनही वाढलेल्या अपेक्षांमुळे किंवा तडजोड करायची तयारी नसल्यामुळे योग्य तसा जोडीदार मिळत नाहिये तसेच आजकाल कामाच्या वेळा, तणाव, स्पर्धा या सगळ्यामुळे तरुण पिढीपुढे आव्हाने जास्त आहेत. हे जरी खरे असले तरी कुठेतरी सुवर्णमध्य काढायची तयारी दोघांनी दाखवायला हवी. प्रत्येकाला अगदी मनासारखा जोडीदार /साथीदार मिळेलच असे नाही. मानपानाचा विचार केला तर सद्यपरिस्थितीत 'फक्त मुलगी द्या हो', अशी विणवणी वर पित्याकडून वधू पित्याकडे होताना दिसते. वधू पित्याकडून नोकरदार मुलांची मागणी केली जाते. परंतु ही मानसिकता बदलायला हवी. आयुष्याचा प्रत्येक वळणावर जशी थोडीफार तडजोड आपण करत असतो तशीच तडजोड जोडीदाराबरोबर केली तर बिघडले कुठे ? लग्न जुळणे अवघड होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कित्येकांना आपण किती खोल पाण्यात आहोत याची कल्पना असत नाही. पण एखादे स्थळ चालून आले की अपेक्षा व अटींच्या बाबतीत झाडावर जाऊन बसणे सुरू होते. समोर कितीही चांगले स्थळ आले तरी आणि सगळं जुळत असतानाही आणखी काही नविन स्थळ येईल का, याची वाट पहात राहणे कितपत योग्य आहे? तुलनेने अधिक चांगले शोधण्यामध्ये मग हातचे स्थळ घालवले जाते. म्हणुनच स्वतःला फार मोठे समजणे आणि अधिक सुंदरतेची व अधिक समृद्धतेची अपेक्षा करणे टाळले पाहिजे. आपले पद, प्रतिष्ठा, पैसा याची तुलना येणाऱ्या स्थळांबरोबर कुठवर करत राहणार?
दुसरे म्हणजे, एखादे स्थळ पाहून झाल्यावर स्वतःहून काही न कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहणे बरे नाही. होकार / नकार कळविण्यात टाळाटाळ किंवा विलंब करणे बरे नाही. पसंती आली असतानाही उगीच थांबणे बरे नाही. आलेल्या स्थळास ठराविक वेळेत होकार अथवा नकार कळवणे अत्यावश्यक आहे. परंतु हे कसे कळवावे, याबद्दल संकोच दिसून येतो. खास करून नकार कसा कळवावा, हा प्रश्न अवघड वाटतो. पुढच्या पक्षाला नकार कळवला तर त्यांना वाईट तर वाटणार नाही ना, हा प्रश्न समोर असतो. होकार हा आपणास योग्य वाटेल त्या शब्दात कळवू शकतो. परंतु नकार कळविण्यात विचार करावा लागतो. अशा बिकट प्रसंगी पुढील पक्षाला कळवू शकतो की आपण आमच्या वैवाहिक प्रस्तावाला पसंतीचा प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो. तथापि, आपला प्रस्ताव आमच्या अपेक्षेप्रमाणे काही बाबतीत बसत नसल्याने आम्ही पुढचे बोलू शकत नाही, या करिता क्षमस्व! तरी परंतु आम्हाला आमच्या नातेसंबंधात किंवा परिचयात असलेले आणि तुम्हाला अनुरूप असे कुठले स्थळ दिसून आले तर आम्ही आपणास त्या बद्दल अवश्य कळवू. आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असे कळवून टाकावे म्हणजे ताटकळत ठेवल्याचा आरोप कुणी करणार नाही. शिवाय फोन आला असता "मग सांगतो, विचारून सांगतो, कळवितो" असे म्हणून आशा लावून ठेवल्याचा ठपका पण कुणी ठेवणार नाही. महत्त्वाचे म्हणजे होकार कळविण्यात विलंब करणे म्हणजे त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट करून देणे होय. पालकांनी बऱ्याच वेळा फोन बंद ठेवणं, लवकर फोन न उचलणं, स्वतः पुन्हा फोन न लावणं /वेळ लावणं हे वर्तन योग्य नाही.
चौकशी करतांना कोणाच्या तरी सांगण्यावरून दिशाभूल होऊ शकते म्हणुन स्वतः खात्री करणे केव्हाही चांगले. प्रत्यक्ष भेट देवून पहाणे तसेच समक्ष मुलगा/ मुलगी त्यांचे कुटुंबिय ह्यांच्याशी भरपूर बोलणे महत्त्वाचे. विवाह ठरत आला असताना कुठून तरी काही तरी विपरित किंवा अफवा कळताच पटकन नकार देण्या अगोदर त्या बाजूच्या माणसांना भेटून शहानिशा करावी. शिक्षण, नोकरीचे ठिकाण इ. बाबीकडे जातीने लक्ष न देता भलत्यानांच फोन करुन माहिती काढणे, स्वतः घर न सोडता दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून राहणे टाळावे. स्थळाची पसंती करणार्या प्रमुख घटकांनी अर्थात दोन्ही कडील आई-वडील, मुलगा व मुलगी आणि कुटुंबातील काही घटकांनी मिळून सर्व चौकशी करुन विवाह निश्चिती करण्याऐवजी अनेकांना (मित्रांना) बघण्यासाठी पाठवणे आणि त्या बघ्या मंडळीवर अधिक विश्वास ठेवणे संयुक्तिक ठरेलच, असे नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवाहेच्छू मुलामुलींच्या पालकांच्या निर्णयामध्ये एकवाक्यता नसली तर त्यातून होणारे लागोपाठचे विवाद मुला- मुलीच्या आयुष्याची वाट लावण्यास कारणीभूत ठरतात. मुला- मुलीचं वय अधिक वाढलं तरी काही पालक बिनधास्तपणे राहतात. मुलांच्या भावना लक्षात घेत नाहीत. विवाहात वयाला महत्व असते. बाकी सर्व गौण आहे, परंतु मुला-मुलींनी वेगळ्याच विश्वात रममाण राहणे, करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणे, हे आजकाल काही नवे राहिले नाही. जसं- जसं वय वाढतं तसं- तसं सौंदर्य घसरू लागते. वय वाढल्यावर काहीही तडजोड पत्करण्यापेक्षा योग्य वेळेत निर्णय कसा घ्यावा, याबाबत पालक वर्ग चिंतेत आहे. आजकालचे समजदार पालक कोण तर जे उपलब्ध स्थळांच्या यादी, फोटो वर अवलंबून न राहता आपल्या मुलामुलींना घेवुन वधू-वर मेळाव्यांना आवर्जून उपस्थिती दर्शवितात ते होत. मेळाव्यातील उपस्थितांकडून त्यांच्या नातेवाईकांतील स्थळे माहित होत असतात. वधू- वरांना समक्ष पाहता आल्यामुळे अनेक गावे फिरण्याचा वेळ, खर्च वाचतो. मेळाव्यात वधू - वर संस्था संचालकांकडून खूप मौलिक माहिती, उदाहरणे व अनुभव ऐकायला मिळतात व पुढची वाटचाल सोपी होते.
लग्न जुळण्यात अडसर ठरणारी इतरही काही छोटी-मोठी कारणे आहेत. जसे की क्षुल्लक बाबींचा दोष काढणे; रंग उंची, पगारातील तफावत, शेती नाही, पुणे/मुंबई शहरात फ्लॅट/ प्लॉट नाही, आदी बहाने करून जमवण्यापेक्षा फिस्कटण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे; अनेक वेळा अनेक फोटो मागवणे परंतु प्रत्यक्ष मुलगा /मुलगी न पाहता फोटोवरून रंग, चेहरा, बांधा, स्वभाव ह्याचा (खोटा) अंदाज बांधणे; "रजा नाही/ वेळ नाही" असे सांगून हातचं आलेलं स्थळ घालवणे, परंतु पै - पाहुण्यांच्या लग्नाला हजर राहून तिथं अंदाजपंचे शोध सुरू ठेवणे; मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमप्रसंगी मुलगा व मुलीस आपसात संवाद साधण्यासाठी किमान १० मिनीटे तरी वेळ देण्यास टाळाटाळ करणे.
आपल्याला एखादे स्थळ कोणत्याही ठिकाणाहुन भेटल्यास, योग्य असल्यास आपल्या संबंधित नातेवाईक मित्र, मैत्रिणी सोबत संपर्क करून स्थळाची विचारणा करून एकदा तुम्ही स्वत: पुढाकार घेऊन जेथून तुम्हाला माहिती मिळाली त्या व्यक्तीस किंवा एखाद्या सुचकास बरोबर घेऊन मुलाच्या घरी जाऊन यावे. मुलाच्या घरचे लोक घरातील परिस्थिती बघु शकतात. आपली मुलीची बाजू आहे, म्हणून प्रयत्नांच्या बाबतीत शांत बसू नये तर स्वत: थोडा पुढाकार घ्यावा. मागून सर्वांना सारखेच मिळत नाही. त्यामुळे थोडे प्रयत्नशील व्हा! वेळेवर लक्ष द्या, वेळ फार महत्वाची आहे, आज जे मिळतय, ते उद्या मिळेलच याची शाश्वती (गॅरन्टी) नाही, हे आवर्जून लक्षात घ्यावे.
✍️ रविराजे उपाध्ये
93004 43317
Post a Comment