गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
लोकहितार्थ विशेष लेख
सुखा- समाधानाचे जीवन जगण्यासाठी फक्त पैसा कामाचा नाही तर समजूतदार, सहनशील व संस्कारी जोडीदाराची आवश्यकता असते. सुखाचा संसार म्हटले तर 'या झोपडीत माझ्या' निवास करतो नाहीतर बंगल्यामध्ये देखील भांडणतंटे आढळतात. अटी- शर्ती लावून व्यापार होतो, रिश्ते-नाते नाही! नवीन नाते जोडणे व ते टिकवणे या साठी कुठल्याही परिस्थितीत एकमेकांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. या समायोजन तत्वातच सुखी वैवाहिक जीवनाचे गमक दडलेले आहे.
कशी-कशी परिस्थिती आली आणि त्यात कसा संसार निभावला, हे आपण आपल्या आई- वडिलांकडून शिकू शकतो ! बहुतेक माता-पिता संयुक्त कुटूंबात वाढले असतील. कदाचित वडिलधारी मंडळींच्या धाकात ते वाढली असतील पण त्या काळात व्यक्तीच्या गरीबी- श्रीमंतीपेक्षा प्रेम व माणुसकीला जास्त महत्व होते. नातेसंबंधांची वीण घट्ट होती. वडिलधारी मंडळींचा इतका मानसन्मान होता की लग्न संबंधात रिश्ता ठरविण्यात त्यांचा शब्द अंतिम होता.
आजचा काळ आधुनिकतेचा. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व प्राप्त झालेले! आज अनेक युवा शिक्षणाचा उच्च दर्जा प्राप्त करीत आहेत. उच्च शिक्षण प्राप्त झाल्यानंतर एक तर करियर बनविण्याचे आव्हान युवावर्गापुढे असते, तर त्याचबरोबर दुसरा स्वाभाविक परिणाम म्हणजे करीयर सेटिंग नंतर आपल्या भावी जोडीदाराबाबतच्या त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असणे!
आपले भावी जीवन सुखासमाधानात व्यतीत व्हावे, म्हणून केलेल्या अपेक्षा चुकीच्या कशा असू शकतील? पण अनेक बाबतीत या अपेक्षा भौतिकवाद आणि चंगळवादाची परिसीमा गाठलेल्या आढळतात. उदाहरणार्थ, विवाहेच्छुकाने जर अपेक्षा ठेवली की 'स्वत:चा गाडी-बंगला असलेला जोडीदार मला हवा', तर कसे होईल? लग्नानंतर आयुष्यात हे सर्वकाही मिळवता येऊ शकते न! कमतरता निकट भविष्यात दूर केली जाऊ शकते, हा विश्वास हवा. परंतु यासारख्या अपेक्षा कितीही अवास्तव वाटत असल्या तरी त्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असल्या कारणाने त्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. अपेक्षांचे स्वरूप पाहता अपेक्षेप्रमाणे तसे स्थळ मिळणे कठीण होऊन बसते. त्यातही जर तडजोडीची भूमिका ठेवली नाही तर लग्न जुळणे बऱ्याचदा मुश्कील होऊन बसते. युवकांमध्ये विवाहाच्या वाढत्या वयामागे असलेले हे कारण एक सामाजिक समस्या म्हणून ठळकपणे पुढे येत आहे. उच्च शिक्षण प्राप्ती आणि त्यानंतरची रोजगार प्राप्ती यासाठीच्या संघर्षात टळत चाललेला विवाह आणि ओसरत चाललेले तारुण्य याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही."करियर बनवल्यावर लग्नाचे बघू", असा विचार केल्यानंतर कालांतराने अशी वेळ येते की मग स्वत:चे करियर आणि स्वत:चे लग्न यांची सांगड घालता- घालता लग्नाचे वय कधी निघून गेले, हेच कळत नाही. हे लिहित असतांना कुणाच्या भावना दुखविण्याचा कोणताही हेतु नाही.
बिझनेस कम्युनिटी (बनिया समाज) मध्ये उच्चशिक्षित मुलींकडून 'उच्चशिक्षित मुलगा हवा', ही अपेक्षा पुढे आली तेव्हा हे समाज प्रामुख्याने व्यावसायिक असल्याने या समाजात उच्चशिक्षित मुलांची कमतरता जाणवू लागली व नवीन समस्या पुढे आली. कितीही गडगंज श्रीमंत असेल पण उच्चशिक्षित नसेल तर असे स्थळ त्या मुली नाकारू लागल्या. यावरून त्या समाजातील धुरिणांनी चिंतन चर्चा सुरू केली. कार्यकर्त्यांनी व्यापक प्रमाणात समाजप्रबोधन घडवून आणले. वधूवर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे आदी संकल्पनांचा प्रचार-प्रसार केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले.
विवाह हा दोन परिवारातील विधी संस्कार प्रसंग असला तरी खरे तर ते एक 'धार्मिक सामाजिक' कार्य आहे, या अंगाने विचार करता सामाजिक संस्थांसाठी तो एक सामाजिक चळवळीचा विषय बनला आहे. विवाह जुळण्यामध्ये अंतर्भूत असलेली सामाजिकता लक्षात घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. समाजात होणारी स्थित्यंतरे व त्याचा विवाह संस्थेवरील परिणाम; आजच्या तरुणाई मध्ये जोडीदाराबद्दल असलेल्या वाढत्या अपेक्षांचा दबाव, लग्नाच्या वाढत्या वयामुळे अविवाहित तरूणांवर होणारा मानसशास्त्रीय परिणाम, भरमसाठ अपेक्षा लादून केलेल्या लग्नानंतर उद्भवणारा वाढत्या घटस्फोटांचा धोका, उशिराने लग्न केल्यामुळे येणाऱ्या संभाव्य वैद्यकीय समस्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या तरूणांच्या वैवाहिक समस्या आदी विषय हे समाजाची चिंता करणाऱ्या मान्यवरांचे चिंतनाचे विषय झालेले आहेत. समाजातील जातीय विषमता नष्ट व्हावी, हा उद्देश ठेवून कुणी आंतरजातीय विवाह करीत नाहीत किंवा समाजातील आर्थिक विषमता कमी व्हावी, हा उद्देश ठेवून देखील कुणी ठरवून सजातीय लग्न करीत नाही. समाजाप्रतीचे समर्पण प्रत्यक्षात कुठे दिसत नाही, हे देखील विचारणीय आहे.
दुसरीकडे, परंपरेने व्यावसायिक जातीत नसलेल्या समाजामध्ये खाजगी कंपनीत नोकरी करणारा, स्वत:चा स्वतंत्र प्रतिथयश बिझनेस करणारा किंवा कृषी क्षेत्रातील प्रगतीशील कृषक या स्थळां पेक्षा सरकारी नोकरीवर असलेल्या स्थळाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. काही अपवाद सोडले तर, सरकारी नोकरदार व्यक्ती सरकारी नोकरालाच पसंत करणार, असे सर्वसाधारणपणे दिसते. सरकारी नोकरीवाले स्थळ मिळाले नाही तर अशा स्थितीत 'अपेक्षे'मध्ये लवचिकता न दाखविल्यास विवाहामध्ये विलंबाची समस्या निर्माण होऊ शकते. लग्नासाठी प्रयत्न करतांना एक प्रकारची पुरुषप्रधानता पाळली जाते. युवकाने युवती पेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे शिक्षण, कमाई, नोकरी संदर्भात वरचढ असले पाहिजे, याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जाते (अर्थात काही अपवाद वगळता). यात तडजोड स्विकारली नाही, तर लग्नाला उशीर होऊ शकतो आणि उशीर झाला तरी त्यांना तो चालतो. लग्न जुळवण्यात विलंब होण्यामध्ये हे सुद्धा एक कारण आहे.
विवाह स्थळे सुचविण्यासाठी मुला- मुलींचे नातेवाईक महत्वपूर्ण भूमिका निभावत असतात. आपण सुचविलेली अनेक स्थळे अपेक्षेत न बसल्या कारणाने नाकारण्यात आली, असे वारंवार घडू लागले की मग मध्यस्ती करणारे नातलग शेवटी मध्यस्ती करणे सोडून देतात. त्यामुळे आधीच अवघड झालेले काम अजून अधिक अवघड बनून बसते. मदत करू पाहणारे नातेवाईकच जेव्हा यातून अंग काढून घेतात तेव्हा अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी अन्य पर्याय शोधावी लागतात.
अशा परिस्थितीत परिणय संबंध जोडतांना समाजात तडजोडीचे सौजन्य आणि नात्यात प्रेमाचे चैतन्य वाढावे, ही एक सामाजिक चळवळ समजून प्रा. आनंदराज वानखेडे, मा. राहुल शिरसाट, मा. विजय मांडवे, मा. संजय भालेराव यांच्या सारखे अनेक जेष्ठ कार्यकर्ते विवाह क्षेत्रात निःस्वार्थ कार्य करतांना दिसत आहेत, ही एक आश्वासक बाब आहे. कमीत कमी खर्चात विवाह संस्कार विधी कसा संपन्न करावा, याबद्दलही ते समाज माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी पुनर्विवाहाच्या चळवळीला सुरुवात केली होती. त्यांचेच कार्य पुढे चालवित घटस्फोटीत, विधवा-विधुर आणि दिव्यांग जणांच्या पुनर्विवाहासाठी देखील समाज माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी गरीब घरच्या मुलींच्या लग्नकार्यात समाजाने आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केलेले आहे. लग्न हा विषय 'समस्या' म्हणून स्विकारला तरच त्यावरील 'उपाय' शोधले जातील.
शेवटी, विवाहेच्छुकांसाठी या क्षेत्रातील कार्यरत वरिष्ठ जणांकडून एकच संदेश आहे की "आपण या पृथ्वीतलावरील अल्पकालीन पाहुणे आहोत. म्हणून लहान- मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही इगो नसावा. या संसारात परिपूर्ण अथवा सर्वगुणसंपन्न असा कुणीच नाही. म्हणून एकमेकांचे गुणही पहा. तडजोड प्रत्येकाला करावी लागते तेव्हाच लग्न जुळतील. वेळ निघून गेल्यावर पॅकेज, प्राॅपर्टी तसेच आपले सौंदर्य अर्थहीन वाटू लागते. म्हणून वेळीच आपले नियोजन करा. सामंजस्याने मिळत्या-जुळत्या जोडीदाराची निवड करून आपले मंगल 'कर्तव्य' आटोपते घ्या."
- रविराजे उपाध्ये,
9300443317
Post a Comment