गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
जनहितार्थ विशेष लेख
अलिकडेच असे वाचनात आले की एका शहरातील जैन समुदायाने एक अनोखा निर्णय घेतला. समाजातील कोणाच्याही लग्नात 6 पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही आणि मग याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरविले. याबरोबरच आश्चर्यजनक ठराव असा की लग्न पत्रिका छापायची नाही तर फक्त वाटस्अप व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे! खास निर्णय म्हणजे प्रि- वेडींग व संगीत संध्या कार्यक्रमावर बंदी!
खरे तर वरील दोन्ही समाज आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. तरी देखील त्यांनी वरील निर्णय घेतले असतील तर त्याबद्दल दोन्ही समाजाचे अभिनंदनच करावे लागेल. दुसरीकडे, आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत. वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो आहोत. तरी देखील या आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे मनापासून स्वागत करीत आहोत आणि सर्व जाती- धर्म- पंथ यांनी या निर्णयाचे पालन करायला हरकत नाही, असा विचार करीत आहोत. समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारामध्ये केले पाहिजे. करोना काळात शासनाने विवाह कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी लग्न खर्चात आपोआप कपात झाली होती. पुन्हा काळ बदलला. आपण बदललो. पुनश्च लग्नात लाखो रूपयांची उधळपट्टी प्रसंगी कर्जबाजारी होत सुरू झाली. तेव्हा आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणास माफ करणार नाही. असा मतप्रवाह समाजात वाहू लागला, असे दिसते.
या विषयावर मग समाजातून वेगवेगळे विचार बाहेर येवू लागले. दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. शेती मालाला भाव नाही. सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. खाजगी नोकरीत शाश्वती नाही. मुलीच्या लग्नाला 100 रु खर्च येत असेल तर मुलालाही 80 रु खर्च येतो. कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो! आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. विवाह हा सोहळा नाही तर तो ' संस्कार ' आहे. कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही. आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे. व्यापारीवर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे. यात इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे. भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको. वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे. वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत! आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे. जेवणावळी, मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा. संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच. मेहंदी किंवा हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी. स्वागत समारंभात साधेपणा आणावा. क्रिकेट 5 दिवसांचा, वन-डे वरुन 20- 20 वर आला. तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ? मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो. लग्न पत्रिकेचा खर्च वाचवून लग्नपत्रिका व्हाट्सअप वरून पाठवावी व संबंधित व्यक्ती पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचे निमंत्रण द्यावे; पुन्हा आठवणीसाठी फोन परत लग्नाच्या अगोदर दोन दिवस करावा. आदी विचार समोर येऊ लागले आहेत.
खरे तर, चांगल्या गोष्टी कोणत्याही जाती- धर्मांतील वा समाजातील असो, त्यांचा स्विकार केलाच पाहिजे. समाज सुधारण्यासाठी सर्वांनी मिळून एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. तेव्हाच हळूहळू सर्व समाज बदलेल व एक दिवस समाजाची चांगली प्रगती होईल !
या संदर्भात बुद्धिस्ट विवाह चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते व समुपदेशक प्रा. आनंदराज वानखेडे यांच्या मतानुसार, पालकांनी काही प्रकारच्या अटी व नियम मान्य केल्या तर बौध्दधम्म संस्कार विधी व्हायला आर्थिक भुर्दंड व वेळ खर्ची पडणार नाही. मंगल परिणय संस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म संस्कार विधि नुसार व नोंदणी पद्धतीने करायला हवा. नेमके काय करायचे आणि काय करायचे नाही, हे पक्के ठरवावे लागेल. जसे, कोणत्याही प्रकारची विवाहपूर्व चित्रफीत टाळू शकतो. धम्मसंस्कार विधी प्रसंगी येणारे सर्वच पाहुणे VIP असतात आणि म्हणून कुणाला पुष्पगुच्छ देत बसण्याची आवश्यकता आहे काय, हे पहावे लागेल. उपासक उपासिका (वर व वधू) हे फक्त पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले असावेत. कुठल्याही परिस्थितीत मिरवणुकीत घोडा आणि वाद्यसंगीत (डिजे) असणार नाही. मंगल परिणयसंस्कार विधी प्रसंगी मंचावर मुख्यत्वे हवे वधू आणि वर! हार घालतांना केवळ वधु वर आणि विधीकर्ता यांच्याशिवाय मंचावर कुणीही असायला नको. धम्मसंस्कार विधी पार पडल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत वाद्यसंगीत हे कानठळ्या बसविणारे फटाके असणार नाहीत. भोजन पूर्णपणे साधे असेल. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही तसेच संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत. त्याऐवजी बुद्ध, भीमगितांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. नोंदणी/ आदर्श पद्धतीने कमीत कमी खर्चात 150- 175 पाहुण्यांच्या उपस्थितीत, जिथे बुध्द विहार असेल त्याच ठिकाणी बौद्धधम्म पद्धतीने मंगल परिणय आयोजित केलेला असेल. असे काही निर्णय घ्यावे लागतील.
आई- वडील खूप कष्ट करून मुला- मुलींना लहानाचे मोठे करतात, जीवापाड जपतात आणि म्हणूनच कर्जबाजारी न होता कसे आटोपते घ्यावे, याची जाण करून देणारा सिध्दार्थ गौतम बुद्धांच्या महामंगल सुत्ताचा उपदेश लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी यांनी मासिक सभेत मंगल संस्कार विधी संबंधात ठराव संमत करून ग्राम शाखांमार्फत अंमलात आणावा, जेणेकरून समाजाचा वायफळ खर्च वाचेल व तसा संदेश घरोघरी पोहचेल.
✍️ रविराजे उपाध्ये, 9300443317
Post a Comment