"जेव्हा नातेवाईकच लग्नात खोडा घालतात"..!

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 


जनहितार्थ विशेष लेख 
भारतीय कुटुंबसंस्कृतीत लग्न म्हणजे एक सामाजिक उत्सव. वर-वधू आणि त्यांचे आईवडीलच नव्हे, तर चुलते-मामे, आत्ये- काका, शेजारी- मैत्रिणी, सगळे सहभागी होतात. पण, याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न वारंवार उभा राहतो की ज्यांना आमच्याशी काही संबंध नाही, ना काही आर्थिक देणं-घेणं, ते नातेवाईक लग्नात का खोडा घालतात ? हे त्यांचं वागणं कधी लक्षात येतं? तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं लग्न ठरवताय किंवा मुलगा/मुलगी त्यांना न विचारता पसंत केलाय; देणं-घेणं किंवा "म्हटलं तसं" केलं नाही; त्यांची भूमिका लग्नात "न विचारता" ठरवली गेली की मग सुरु होतो "असंतोषाचा तमाशा!"
खरंतर त्यांना कोणता त्रास होतो आणि का त्रास होतो ? पहिले कारण म्हणजे “आपलं महत्त्व का विचारात घेतलं गेलं नाही?” हा त्यांच्या विकृत मनात दडलेला प्रश्न! काही लोकांना वाटतं की माझं मत घेतलं नाही म्हणजे अपमान केला. यातच त्यांचा 'एगो' दुखावतो.
दुसरे कारण म्हणजे स्वतःचं समाधान नसेल तर दुसऱ्याचा आनंदही खटकतो. ज्यांचं स्वतःचं आयुष्य समाधानकारक नाही, ते इतरांचं यश बघून अस्वस्थ होतात.
      काहींच्या बाबतीत अशीही खोड असते की आपल्याला कंट्रोल मिळत नाही, मग डिस्टर्ब तरी करू या. काही नातेवाईक सवयीनेच वाद पेरणारे असतात आणि त्यात ते आनंद मानतात.
             काही नातलग सुडबुद्धी बाळगणारे असतात. जुने वाद किंवा वंशातील इर्षा त्यांच्या मनात खदखदत असते. कुठलातरी जुना वाद, अपमान किंवा भांडण अजूनही खोलवर ताजाच असतो. त्यातून मग ते लग्न संबंधात काड्या करतात. 
              अशा नकारात्मक प्रेरणेतून ते कोणते प्रकार करू शकतात? तर ते अफवा पसरवू शकतात; वधू- वरांबद्दल नकारात्मक बोलू शकतात; इतर नातेवाईकांमध्ये संशय निर्माण करू शकतात; एकमेकांविषयी चुकीच्या भावना पेरू शकतात आणि काही वेळा लग्न मोडायचा पद्धतशीर प्रयत्न करू शकतात. हे सगळं करून त्यांना काय मिळतं, याचं उत्तर म्हणजे काही मिनिटांचं नियंत्रण; लोकांच्या लक्षात येण्याचा क्षण; आपल्या अपयशाचं विकृत समाधान आणि शेवटी स्वतःला अडगळीत टाकण्याचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न! 
             अशा एखाद्या नातलगाचा प्रताप लक्षात आल्यावर आपण काय करावं? तर अशा लोकांपासून भावनिक आणि सामाजिक अंतर ठेवावे. आपल्या निर्णयावर खंबीर विश्वास ठेवावा. अशा प्रसंगी  संवादात स्पष्टपणा पण स्वतःचं मन शांत ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही बाहेरच्या आवाजाला तुमच्या नात्यावर परिणाम करू देऊ नका. तुमच्या प्रेमात आणि निर्णयात ठाम राहा कारण ते तुमचं आयुष्य आहे, त्यांचं नाही.
             लग्न ही दोन मनांची आणि दोन घरांची संगती म्हणजे कुणाच्या अहंकाराच्या जोखडात अडकवायची गोष्ट नाही. ज्यांचं प्रेम आहे, ते शुभेच्छा देतात. ज्यांना विकृती व अहंकार आहे, ते अडथळा आणतात पण त्यांची भूमिका आपण स्वीकारतो की नाकारतो, हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे.
           आपल्यावर अशी वेळ येवूच नये म्हणुन नातेवाईक असंतुष्ट होऊ नयेत यासाठी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. वैर वाढू नये याची खबरदारी घ्या. नियमितपणे नातेवाईकांशी बोलत रहा. त्यांच्याशी संवाद साधल्याने त्यांच्या भावना आणि विचार समजतात. नातेवाईकांचे मत, विचार आणि भावना व्यवस्थित समजून घ्या. संवाद साधताना शांत आणि संयमी राहा. नातेवाईकांनी चांगले काम केल्यास त्यांची प्रशंसा करा. गरज भासल्यास नातेवाईकांना मदत करा. नातेवाईकांशी संवाद साधताना नवीन गोष्टी शिका आणि त्यांना शिकवा. खुश आणि सकारात्मक राहा. सकारात्मक विचार आणि आनंदी स्वभाव ठेवल्याने नातेवाईकांशी संबंध चांगले राहतात. नातेवाईकांचा आदर करणे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. नातेवाईकांशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. त्यांनी काहीतरी चुकीचे केले, तर क्षमाशील राहा. नातेवाईकांशी समजूतदारपणे वागा आणि त्यांच्याशी सामंजस्य साधण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक एकमेकांना मदत करत असतील, तर संबंध अधिक दृढ होतात, हे कायम लक्षात ठेवा. नातेवाईकांना समजून घेणे आणि त्यांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपले नातेवाईक आपल्या जीवनात आनंद आणि समाधान आणतील, अशी आशा असू द्या.

रविराजे उपाध्ये 
9300443317

0/Post a Comment/Comments