हवामान खात्याने वर्तविला अवकाळी पावसाचा अंदाज राज्यातील 18 जिल्ह्यांना केला "येलो अलर्ट" जारी..



गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
नागपूर ब्युरो

नागपूर : सध्याच्या घडीला अवकाळी पावसाचा मारा राज्यात सुरूच आहे. यामध्ये विदर्भाच्या काही भागात तापमानाचा पारा पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे तर दुसरीकडे पावसाचा मारा राज्यात काही
भागात सुरूच असल्याने उकाड्यात मात्र मोठी वाढ झाली आहे. शनिवारी दिवशी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये चांगलीच वाढ झाली होती
मात्र, अचानक बदललेल्या वातावरणामुळे आता काही भागांमध्ये उष्णतेचा जोर कमी झाल्याचे जाणवत आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरीही वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना मात्र वादळी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार कायम आहेत. आज, रविवारी देखील तापमानात चढउतार कायम असणार आहेत. अरबी समुद्रापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणापर्यंत आणि मराठवाड्यापासून कर्नाटकत ते अगदी



 तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आजदेखील राज्यात अनेक भागांत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा जोर आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमान सध्या ३१ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे आहे. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचा जोर अधिक असू शकतो. दुपारनंतर व संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने जारी केला पावसाचा "येलो अलर्ट"
हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

0/Post a Comment/Comments