नाकाबंदीवर असलेल्या पोलीस अंमलदाराचे मृत्यूस जबाबदार कारचालकास न्यायालयाने सुनावली 2 वर्ष कारावास 30 हजार रुपये द्रवदंडाची शिक्षा, गडचिरोली येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनायक आर जोशी यांचा न्याय निर्णय, दंड न भरल्यास सहा महिने वाढीव शिक्षेची तरतूद...

दि. २४/०७/२०२५

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 


सविस्तर वृत्त असे की, यातील फिर्यादी नामे महारूद्र परजने, पोस्टे आरमोरी वय-३३ वर्षे धंदा- नौकरी सपोनि, पोस्टे आरमोरी यांच्या पोस्टे आरमोरी येथील तोंडी रिपोर्ट नूसार, लोकसभा निवडणूक-२०१९ दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोस्टे आरमोरी हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. दि. १६/०३/०२०१९ रोजी पोस्टे प्रभारी यांच्या आदेशाने रात्री हजेरी दरम्यान सपोनि. महारुद्र परजने व नापोशि/ ३२८० गोपाल जाधव व पोस्टे आरमोरी येथील इतर अंमलदार यांची आरमोरी ते गडचिरोली रस्त्यावरील सोनु धाबा समोर नाकाबंदी ड्युटी लावण्यात आली होती.

दि. १७/०३/२०१९ चे ००.२२ वा. पोनि. अजित राठोड, सफौ/७३२ सुधाकर मनबत्तुलवार, नापोशि/२३३८ केवळराम येलोरे, नापोशि/ ३२८० गोपाल जाधव, होमगार्ड ठाकरे व भानारकर, चापोहवा/७७८ दिलीप क्षिरसागर असे शासकीय वाहनासह सोनु धाबा समोर आरमोरी ते गडचिरोली रस्त्यावर अंदाजे ०१.०० वा. दरम्यान नाकाबंदी करत असताना नापोशि/येलोरे व होमगार्ड/भानारकर हे काही वाहनांची तपासणी करीत होते. त्याच दरम्यान सफौ/मनबत्तुलवार व इतर अंमलदार यांनी बॅरीकेटजवळ थांबून आरमोरीकडुन गडचिरोली कडे येणाऱ्या चारचाकी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर MH ३३/०८८८ चारचाकी वाहनास टॉर्च दाखवून थांबण्याचा ईशारा केला असता, कार चालकाने त्याच्या कारचा वेग कमी न करता वाहन तपासणी करत असलेल्या पोना/२३३८ केवळराम येलोरे यांना जोराची धडक दिली. त्यामुळे केवळराम येलोरे हे जोरात उसळुन खाली पडले व कार समोर जाऊन रोडच्या उजव्या बाजूला खड्यात पडली. ड्युटी वरील इतर अंमलदार यांनी तात्काळ येलोरे यांना उचलले असता, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तात्काळ पोलीस स्टाफसह उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचारकामी रवाना करण्यात आले होते. त्यानंतर नाकाबंदी मधील पोलीस पथकाने कार चालकास पोस्टे आरमोरी येथील पोलीस स्टाफच्या ताब्यात दिले होते. यादरम्यान नापोशि/२३३८ केवळराम येलोरे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले होते.

असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून वाहन चालक नामे मोरेश्वर वामन हेडाऊ, वय-३२ वर्षे, व्यवसाय चालक रा. गोकुळनगर, गडचिरोली याचे विरुदध पोलीस स्टेशन आरमोरी येथे अप. क्र. ७८/२०१९ कलम २७९, ३०४(अ), ३५३, ३३३ भादंवि सहकलम १३२, १७९, १८४, १८५ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस दि. १७/०३/२०१९ रोजी अटक करून, आरोपी विरूध्द सबळ पुरावा मिळून आल्याने, तपास पुर्ण करून, मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सेशन केस क्र. २०/२०२० नुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली येथे खटला चालवून, फिर्यादी, पंच, साक्षीदारांचे बयान तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद मा. न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक २४/०७/२०२५ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. विनायक आर. जोशी यांनी आरोपी नामे मोरेश्वर वामन हेडाऊ, वय-३५ वर्षे, रा. गोकुळनगर वार्ड क्र. २२, गडचिरोली यास कलम ३०४ (अ) भादंवी व १८४ मोवाका मध्ये दोषी ठरवून एकूण २ वर्षे सश्रम कारावास व ३०,००० /- रू द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.

सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकिल श्री. निळकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहीले. तसेच गुन्हयाचा तपास सपोनि. चेतनसिंग बबनसिंग चव्हाण यांनी केला आहे. संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी पोनि / चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउपनि / शंकर चौधरी, सफौ/ २८२४ सागर मुल्लेवार, मपोहवा/जिजा कुसनाके, मपोहवा/२९०६ मिनाक्षी पोरेड्डीवार, मपोशि/३३९ छाया शेट्टीवार यांनी कामकाज पाहीले.

0/Post a Comment/Comments