पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई .भामरागड दलमचा नक्षल्यांचा स्थळ पोलिसांनी केला उध्वस्त. परिसरात पोलीस प्रशासनाची शोध मोहीम तीव्र. नक्षलांचा शस्त्रसाठा केला जप्त...


गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 

गडचिरोली : सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यात व छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षल व पोलीस यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे .अश्यातच सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या भामरागड दलमच्या नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड यांच्या अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र कवंडे जवळील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर भामरागड दलमचे काही सशस्त्र नक्षली घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र जमून तळ ठोकून बसले असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान राबविण्याची योजना आखली.



रविवारी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील सुमारे २०० जवान या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना झाले होते. मौजा कवंडे जवळ असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पोहोचल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली.
सोमवारी सकाळी पोलीस पथकातील जवान सुरक्षिततेची काळजी घेत समोर जात असताना, नक्षल्यांना पोलिसांच्या येण्याची चाहूल लागली. त्यामुळे नक्षल्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनीही मोठ्या धैर्याने प्रत्युत्तरादाखल आणि आत्मरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. विशेष म्हणजे सुमारे दोन तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

परिसरातील भागांमध्ये जवानांनी शोधमोहीम राबविली असता , घटनास्थळावरून १ इन्सास स्वयंचलित रायफल, १ सिंगल शॉट रायफल, १ मॅगझिन, १ डेटोनेटर, १ रेडिओ, ३ पिठु, २ वॉकीटॉकी, २ वॉकीटॉकी चार्जर आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या माओवादविरोधी अभियानादरम्यान विशेष अभियान पथकातील जवानांनी नक्षल्यांचा तळ पूर्णपणे नष्ट करत त्यांना पुन्हा एकदा मोठी पिछेहाट करण्यास भाग पाडले आहे.


गडचिरोली पोलिसांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्धची ही लढाई यापुढेही अविरतपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माओवाद्यांचा रिमोट करण्यासाठी परिसरात शोध म्हणून तीव्र करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments