महिलेला केली मारहाण अन् काढले घराबाहेर दोन लहानग्यासोबत देवळात काढली महिलेने रात्र.. महिलेच्या मदतीला सामजिक संघटना आली धावून....






गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा
 दिनेश रामाजी बनकर
 मुख्य संपादक

मुंबई :- नवी मुंबईतीत रबाळे परिसरातील ३० वर्षीय महिला मुंबईतीत कुर्ला (पूर्व) कामगार नगर मधील मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी(मर्जी) संघटनेच्या कार्यालयात शनिवारी दुपारी १२ वाजता दाखल झाली. तीच्यासोबत दोन लहान मुली ही होत्या. तिच्या एका हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. तर दुसऱ्या हाताने तिने मुलीला काखेत घेतले होते. तिच्या हातातील पिशवीबाहेर काही कागदपत्र पिशवीतून बाहेर डोकावून पाहत होती. तशी ती कार्यालयात आल्याने संघटनेच्या समन्वयिवका , विधी शाखेची विद्यार्थीनी प्राप्ती भानुदास कोळी यांना काही विशेष वाटले नाही. कारण मागील दीड वर्षांपासून त्या मर्जी संघटनेत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून महिला आणि बालकासह समाजातील अन्यायग्रस्तांचे प्रश्न त्या हाताळत आहेत. त्यामुळे दोन मुलींसोबत आलेल्या महिलेस समोरील खूर्चीवर प्राप्तीने बसावयास सांगितले. ती खूर्चीवर स्थिरावल्यानंतर बोला ताई काय काम आहे. मी आपली काय मदत करू शकते? प्राप्तीच्या या प्रश्नावर ऊत्तर देण्याऐवजी त्या महिलेने हंबरडाच फोडला. ती ओस्काबोस्की रडू लागली. तिच्या या रडण्यामुळे स्मशान शांतता पसरली. कार्यालयात आलेली हरएक व्यक्ती सदर महिलेकडे पाहत होती. तिच्या रडण्यावरुन तिच्या सोबत काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज प्राप्तीला आल्यामुळे तिने थोडा वेळ स्तब्ध राहण्याची भूमिका घेतली. रडल्याने आता तिच्या दु:खाला वाट मोकळी झाली होती. ती भानावर आली. पाण्याने भरलेला ग्लास तिच्या पुढे करून प्राप्ती तिला म्हणाली की, 'ताई! पाणी घ्या आणि शांतपणे सांगा तुमच्या सोबत काय घडल'. यावर सदर महिला म्हणाली की, 'मी मीरा आठवी शिकलेली. ही माझी सहा वर्षांची मुलगी तन्वी आणि ही साडे चार वर्षांची राधिका (दोघींचीही नाव बदललेली), मला भाऊ बहीण कोणीही नाही. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले. आईने लोकाची धुणी भांडी करून मला वाढवलं. मार्च २०१६ मध्ये मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या घनश्याम नावाच्या व्यक्तीबरोबर माझ लग्न लाऊन दिलं. तो एका नर्सिंग ब्युरोमध्ये खाजगी रुग्ण सांभाळण्याचे काम करतो. लग्नानंतर जेमतेम एक महिनाच सुरळीत गेला असेल. त्यानंतर माझ्या लक्षात आले की माझा पती, सासू आणि दिर ह्या तिघांनाही ही दारूचे व्यसन आहे. परंतु आता मी लग्न केले होते. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय मला पर्याय नव्हता. मी परिस्थिती सोबत समझोता करून पतीसमवेत सासरी नांदत होते. मला पहिली मुलगी तन्वी झाली आणि त्यानंतर अडीच वर्षांनी दुसरी मुलगी राधिकाचा जन्म झाला. लागोपाट दोन मुली झाल्यामुळे घरातील वातावरण कमालीचे दूषित झाले होते. माझा वरील आत्यचारांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच होते. अशातच एका दिवशी माझ्या मद्यपी दिराने माझी मोठी मुलगी तन्वी हिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनमुळे मी कमालीची हादरून गेले. माझ्या अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली. तो तुरुंगात गेला आणि माझे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. माझा पती त्याच्या भावाविरोधत मी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आजतागायत माझ्यावर सतत दबाव टाकत आहे. संसार संपुष्टात आल्यामुळे मी दोन मुलींसह सासर सोडून नवी मुंबईतील रबाळे येथे माझ्या वृध्द आईकडे रहावयास आले. परंतु ही तर एकच मुलगी आहे. हा तर मुलगा दिसतोय. प्राप्तीच्या या प्रश्नाला उत्तर देताना मीरा म्हणाली की, माझ्या लेकीवर अतिप्रसंग झाला होता त्यामुळे पुन्हा एखाद्या वासानांधाची ती शिकार होऊ नये म्हणून मी तिची व केस मुलांसारखे कापले असून तिचा हा पेहराव देखील मुलांसारखा ठेवला आहे. तिचे हे उत्तर ऐकून आजही अल्पवयीन बालके किती असुरक्षित आहेत असा यक्षप्रश्न पालक आणि समाजासमोर आ वासून उभा राहिला आहे. रबाळेत माझी आई आणि मी माझ्या दोन मुलींसोबत राहत होते. आमच्या घरापासून काही अंतरावर अनेक नातेवाईक राहतात. माझे मामा-मामी आणि त्यांच्या मुलीदेखील आमच्या घरापासून काही अंतरावर राहतात. आई कामावर जाते आणि मी घरी माझ्या मुलींना सांभाळते. त्यामुळे शुक्रवारी मी माझ्या आईला म्हणाले की, 'तु कामावर जाऊ नकोस. घर सांभाळ माझ्या मुलींना बघ. परंतु आईने माझ्या मुलींना सांभाळण्यास नकार दिला. यावरुन आम्हा मायलेकीत वाद झाला. आमच्या दोघींच्या भांडणाची माहिती माझ्या मामा-मामीला मिळाली. मामी आणि तिच्या दोन मुली व माझी आई अशा चौघींनी मिळून माझ्या अल्पवयीन मुलींसमोर मला जबर मारहाण केली. त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन माझी केसंदेखील ओढली. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून दोन्ही मुलींना घेऊन मी स्थानिक पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी माझी एन.सी. लिहून घेतली. यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. पोलिसांनी मला हाकलून लावले. असं तिने मध्येच रडून सांगितले. तू दिवसभर कुठे होतीस आणि रात्र कुठे काढलीस. प्राप्तीच्या या प्रश्नावर मीरा म्हणाली की, दोन मुलींना घेऊन मी ऐरोली रेल्वे फलाटावर खूप वेळ बसून होते. कुठे जावं आणि काय कराव हे मला सुचत नव्हतं. मुलींसोबत स्वतःला संपवाव असा अनेकवेळा विचार आला. पण मी निर्णय बदलला आणि रात्री दोन्ही मुलींना घेऊन पूर्ण रात्र रबाळे येथील एका देवळात काढली. पहाटे सहा वाजता पुन्हा मी आईच्या घरी गेले. कागदपत्रांची पिशवी घेऊन घराबाहेर पडले आणि आता विनातिकीट रेल्वेने तुमच्याकडे आले. हे सर्व ती सांगत असनाच तिची सहा वर्षांची मुलगी खुर्चीवर पेंगत होती. (झोपेची ग्लानी) प्राप्तीने तिला ऑफिस मधील चादर दिली आणि मुलीला झोपविण्यास सांगितले. तीन मुलीला चादरीवर उचलून ठेवताच काही क्षणातच मोठी मुलगी तन्वी गाढ झोपी गेली. मुलीला चादरीवर ठेवून मीरा पुन्हा खुर्चीवर येऊन बसली. तू काही खाल्लयं का? मुलींना काही खायला दिलस कां? असा प्रश्न तिला विचारला असता तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. तिचे अश्रू पोटातील भूकेची आग सांगून गेले. पोटभर जेवण या घरगुती खानावळीतून प्राप्तीने दोन लंचची ऑर्डर केली. आता कुठे जाणार? कुठे राहणार? या प्रश्नांवर ती म्हणाली काही माहित नाही. तुम्ही जर व्यवस्था केली तर खूप उपकार होतील. तिच्या मुलींना सुरक्षित निवारा, पीडीतीचे समुपदेशन आणि वैद्यकीय मदतीची गरज होती. त्यामुळे ताबडतोब हालचाली सुरु झाल्या. महिला व बालकल्याण विभागाच्या काही संरक्षण अधिकारी (पी.ओ.) यांना प्राप्तीने संपर्क साधण्यास सुरूवात केली. एकिकडे त्यांच्या निवाऱ्याची शोध मोहीम सुरू झाली. इतक्यात जेवण आले. मीरा आणि तिची मुलगी राधिका पोटात भडकलेल्या भुकेच्या आगीला शांत करीत होत्या. सायन येथील वन स्टोप सेंटर (तात्पुरता निवारा केंद्र) आता जवळपास निश्चित झाला. आता दुपारचे अडीच वाजले होते. इतर पीडीतही निघून गेले होते. त्यामुळे प्राप्तीने घरुन आणलेला टिफिन उघडला. तीने तांदळाच्या भाकरीचे दोन घास मोडले असतील एवढ्यात सदर महिलेने तिला प्रश्न विचारला की ताई, आम्हाला कुठे पाठविणार? यावर सायन. हे उत्तर मिळताच तीने झोपेत असलेल्या तन्वीला ताडकन ऊठवले. नको, नको मला तुमची मदत नको. असं म्हणत ती ऑफिसमधुन बाहेर पडण्याची घाई करू लागली. तिच्या वागण्यातला बदल बघून मोडलेला भाकरीचा तुकडा तसाच डब्यात ठेवून प्राप्ती जागेवरून उठली आणि तिच्या जवळ गेली. काय झालं, का मदत नको? तिच्या या प्रश्नावर उत्तर न देता ती म्हणाली की, हे उरलेल जेवण (हॉटेलातून मागविलेल्या दोन लंच पार्सल पैकी राहिलेल एक लंच पार्सल) मला द्या, मला आणि माझ्या मुलीना त्याची गरज आहे. मुळात ते दोन लंच सदर महिला आणि तिच्या मुलीकरीता मागविले होते. तीला ते पार्सल दिले. जेवणाची पिशवी मिळताच ती वाऱ्याचे वेगाने ती ऑफिस मधून बाहेर पडली. अगं, थांब थांब असे म्हणत प्राप्ती ही अनवाणी पावलांनी तिच्यामागे बाहेर पडली. तिने तिला रस्त्यात गाठले. तीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती न थांबता कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघून गेली. पायात चप्पल नसल्यामुळे प्राप्ती पुन्हा ऑफिसमध्ये आली. प्राप्तीच्या सांगण्यावरुन पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. कारण ही महिला कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत होती. तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यामुळे या महिलेस आणि तिच्या दोन मुलींना सुरक्षित ठिकाणी पोहचविणे गरजेचे होते. काही काळानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील निर्भया पथक कार्यालयजवळ आले. पथकातील महिला अंमलदारांसोबत प्राप्तीने कामगार नगर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा ती महिला आढळून आली नाही. तिला अनेकवेळा तिच्या मोबाईलवर फोन केले. परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. शेवटी तिने एकदा फोन उचलून आम्ही तुला घ्यायला येतोय. तु रेल्वे स्थानकावर थांब. असे आवाहन प्राप्तीने तिला केले असता ती म्हणाली की मी काही सायनला येणार नाही. मी ऐरोलीला चालले असे सांगून तिने प्राप्तीचा फोन कट केला. परंतु सुरक्षित स्थळी नेणे गरजेचे होते म्हणून प्राप्तीने पोलिसांसोबत कुर्ला रेल्वेस्थानक गाठले. खूप वेळ शोधल्यानंतरही ती तिथे आढळून आली नाही. त्यामुळे निर्भया पोलीस पथकासोबत प्राप्तीने नेहरुनगर पोलीस ठाणे गाठले. तेथील ठाणे अंमलदार फौजदार पगारे यांना घडलेली हकिकत सांगितल्यानंतर फौजदार पगारे यांनी मीराचा नंबर घेऊन तिच्याशी संवाद साधला. फौजदार पगारे यांनी तिचे लोकेशन शोधून काढले. मोबाईच्या लोकेशननुसार ती नवी मुंबई येथील ऐरोलीतील सेक्टर ५ मध्ये होती. यानंतर पगारे आणि प्राप्ती यांनी मीरासोबत जवळपास वीस मिनिटे संवाद साधून तिचे मतपरिवर्तन केले. आता जवळपास साडेचार वाजले होते. ती ठाणे रेल्वे स्थानकावर बसली होती. फौजदार पगारे यांनी सुजाता आठवले (महिला पोलीस अंमलदार) यांना सोबत पाठविले. फलाट क्र. ९वर ती बसली होती. तिथे या दोघी पोहचल्यानंतरही मीराने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. जवळपास अर्धा तास या दोघींनी तिचे समुपदेशन केल्यानंतर ती त्यांच्यासोबत यायला तयार झाली. सायंकाळी सहा वाजता त्या दोघी मीरा आणि तिच्या दोन्ही मुलींना घेऊन नेहरू नगर पोलीस ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडले तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते. स्टेशन डायरीमध्ये नोंद केल्यानंतर प्राप्ती तिला व मुलींना घेऊन खाजगी वाहनाने परळ येथील के.ई.एम रुग्णालयातील सखी संस्थेच्या वन स्टॉप सेंटर मध्ये गेली. दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत प्राप्तीने दाखविलेल्या चिकाटीमुळे आणि नेहरुनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे कौटुंबिक हिंसाचारामुळे मानसिकदृष्टया खचलेल्या महिलेस आणि दोन मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मर्जी संघटनेस यश आले.

*कायदेशीर मार्गदर्शनाकरिता संपर्क*
मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी (मर्जी)
१६ए, कुर्ला कामगार नगर, नंदिकेश्वर मंदिरासमोर, कुर्ला (पूर्व), मुंबई - ४०००२४.
*भ्रमणध्वनी : ९००४५९२१३९*

0/Post a Comment/Comments