गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
गडचिरोली, दि. २१ ऑगस्ट २०२५ :
गडचिरोली जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक, वाहतूक व नागरी विकासाशी संबंधित तिन्ही महत्त्वपूर्ण मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करत निवेदनाद्वारे मागणी सादर केली.
या निवेदनात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तीन प्रमुख मागण्या पुढे मांडण्यात आल्या असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या निर्णयांबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहे.
*_१) गडचिरोली शहराचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून समावेश करावा_*
गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय असून प्रशासकीय, शैक्षणिक व व्यापारी केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. मात्र, आधुनिक पायाभूत सुविधांचा अभाव नागरिकांसाठी अडचणी निर्माण करते.
मा.खा.डॉ. नेते यांनी शहरासाठी पुढील सुविधा उभारण्याची मागणी केली आहे –
स्मार्ट वाहतूक व्यवस्था (सिग्नल प्रणाली, सायकल ट्रॅक, पार्किंग व्यवस्थापन),डिजिटल सुविधा (सार्वजनिक वाय-फाय, ई-गव्हर्नन्स, सीसीटीव्ही)
पाणी व ऊर्जा व्यवस्थापन (स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा, पावसाचे पाणी साठवणूक),पर्यावरणपूरक उपक्रम (स्वच्छता, उद्याने, हिरवळ)आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील स्मार्ट सुविधा (ई-हेल्थ सेंटर, डिजिटल क्लासरूम)
या सुविधा उपलब्ध झाल्यास गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
*२)आष्टी–मूलचेरा–आलापल्ली राज्यमार्ग (५५ किमी) पुनर्बांधणी*
सुमारे ५५ किमी लांबीचा हा मार्ग गडचिरोलीतील शेतकरी, व्यापारी तसेच सुरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, मुसळधार पाऊस व जड वाहण्याच्या वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रुग्णवाहिका सेवा, शालेय वाहतूक आणि मालवाहतुकीवरही गंभीर परिणाम होत असून नागरिकांना प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व संपूर्ण पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा, अशी ठोस मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. *३) मौजा कल्लेड येथील ७०० वर्षे जुने शिवमंदिर पर्यटनस्थळ घोषित करावे*
अहेरी तालुक्यातील मौजा कल्लेड येथे वसलेले प्राचीन शिवमंदिर हे सुमारे ७०० वर्षे जुने धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. निसर्गरम्य गुहेत वसलेले हे मंदिर वर्षभर झऱ्याच्या पाण्याने ओलसर राहते. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
तथापि, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रस्ते, प्रकाशयोजना व विश्रांतीगृहे या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन सर्वांगीण विकासासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी मा.खा. डॉ. नेते यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली.
“गडचिरोली जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी आणि नागरी जीवनातील गरजा लक्षात घेता या तिन्ही मागण्या पूर्ण झाल्यास जिल्ह्याचा विकास एका नव्या शिखरावर पोहोचेल. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या मागण्यांना निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मा.खा. डॉ. नेते यांनी व्यक्त केले.
या त्रिमुखी विकास आराखड्याची अंमलबजावणी झाल्यास गडचिरोली जिल्ह्याला धार्मिक पर्यटन, सुयोग्य पायाभूत सुविधा आणि आधुनिक नागरी सोयी–सुविधा प्राप्त होईल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.
Post a Comment