कोरची तालुक्यात आमदार रामदास यांचा जनता दरबार, मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
कोरची ब्युरो 


कोरची, दि. 16 सप्टेंबर:
कोरची तालुक्याच्या इतिहासात प्रथमच असा प्रसंग घडला की, कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कधी धाडस न केलेला जनता दरबार थेट जनतेमध्ये भरवला गेला. आमदार रामदास मसराम यांच्या पुढाकाराने बिरसा मुंडा सभागृहात हा ऐतिहासिक जनता दरबार पार पडला आणि सभागृह जनतेच्या उत्स्फूर्त गर्दीने अक्षरशः डोलून निघाले.

सकाळपासूनच सभागृहाबाहेर शेतकरी, महिला, युवक, आदिवासी बांधवांची मोठी रांग लागली होती. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांतील लोक आपली समस्या घेऊन आले. रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वीज पुरवठ्यातील अडचणी, आरोग्यसेवेची बिकट परिस्थिती, रोजगाराचा प्रश्न, शाळांतील शिक्षकांची कमतरता आणि वनहक्काच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या अशा असंख्य विषयांवर लोकांनी ठामपणे आवाज उठवला.

जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला आमदार मसराम यांनी संयमाने ऐकून घेतले आणि त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना दखल घेण्याचे आदेश दिले. “जनतेचे प्रश्न वेळेत सुटले पाहिजेत. माझ्या जनतेला न्याय मिळाला नाही तर मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

दरबारात महिलांनी पाणीटंचाईबाबत संताप व्यक्त केला, शेतकऱ्यांनी वीजबिल व पंप कनेक्शनबाबत व्यथा मांडल्या तर तरुणांनी रोजगाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. प्रत्येक विषयावर आमदार मसराम यांनी जागेवर निर्णय घेण्याची भूमिका घेतली.

कोरची तालुक्यात आजवर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी असा जनता दरबार आयोजित केला नव्हता. त्यामुळे लोकांनी याला “खऱ्या अर्थाने जनतेच्या हक्काचा दिवस” असे संबोधले. उपस्थित नागरिकांनी एकमुखाने प्रतिक्रिया दिली की – “हे खरे जनतेचे आमदार आहेत, जे गावागावांत जाऊन लोकांचा आवाज ऐकतात!”

सभागृहात उसळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कोरची तालुक्यात नवा इतिहास रचला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमाला : तहसीलदार प्रशांत गड्डम, गटविकास अधि.फाये, पो. नि. ठाकरे ,काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मनोज भाऊ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, माजी सभापती परसरामजी टिकले, धनपालजी मिसार, नगरपरिषद नगराध्यक्ष कोरची हर्षलताताई भैसारे, माजी जिल्हा प. सदस्य रामसुराम काटेंगे, माजी जिल्हा प सदस्य प्रेमीलाताई काटेंगे, माजी सभापती श्रवण मातलाम,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष हकीमउद्दीन शेख, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरुभाई भामानी,प्रतापसिंह गजभिये, उपसरपंच टेमली धनीराम हेडामी, जगदीश कपूर, 
आदींची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments