सूरजागड खाणीचे कंत्राट मिळविणाऱ्या 'लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने शासानासोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे




गडचिरोली : सूरजागड खाणीचे कंत्राट मिळविणाऱ्या 'लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने शासानासोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे खाणीत सुरू असलेले उत्खनन पूर्णपणे अवैध असून याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकृती फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र शासन, गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्यासह अकरा प्रतिवाद्यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
2007 साली 'Lloyd Metals and Energy Limited' कंपनीला सूरजागड लोहखाणीचे कंत्राट मिळाले. 348 हेक्टर वनजमीन कंपनीला उत्खननासाठी भाडे तत्वावर देण्यात आली. यावेळी कंपनी आणि केंद्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार या खाणीतील लोहखनिजाची इतरत्र विक्री करता येणार नाही.
खाण परिसरात किंवा जिल्ह्यातच कारखाना उभारून प्रक्रिया करण्यात यावी, अशी अट ठेवण्यात आली होती. दरम्यान या करारात बदल करून राज्य शासनाने प्रक्रियेनंतर शिल्लक खनिज विदर्भात विक्री करता येईल अशी परवानगी दिली होती. मात्र, कंपनीने इतक्या वर्षांत ना कारखाना उभारला ना कराराचे पालन केले. खाण सुरू झाल्यापासून 57 लाख टन खनिज परराज्यात विकण्यात आले. दुसरीकडे याभागात जैवविविधता आणि जंगल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाही.
हा तालुका अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत येत असूनही ग्रामसभांना डावलून खाण संदर्भातील निर्णय घेण्यात आले आहे. येथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही. हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनाची याला मूकसंमती होती, असेच दिसून येते. असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे एका स्वतंत्र समितीमार्फत सूरजागड लोह प्रकल्पाची चौकशी करून दोषींना योग्य शिक्षा देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments